Women Health: बाळाच्या जन्मानंतर घरातील सगळ्यांचे लक्ष बाळाच्या खाण्या-पिण्यापासून ते त्याच्या झोपेपर्यंतच्या सर्व गरजांकडे असते. मात्र, या सगळ्या धावपळीत नुकतीच प्रसुती झालेल्या आईचे जेवण वेळेवर झाले का, तिने पुरेसे पाणी प्यायले का किंवा तिला पुरेशी विश्रांती मिळतेय का, याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. प्रसूतीनंतर आईचे शरीर अजूनही सावरत असते आणि त्याचवेळी बाळाला स्तनपान, रात्रीची अपुरी झोप आणि सततची धावपळ सुरू असते. त्यामुळे या काळात फक्त पोट भरणे किंवा जास्त कॅलरी घेणे पुरेसे नसून, शरीराला आवश्यक पोषक घटक मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी येथील, प्रसूती तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. प्रीथिका शेट्टी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
प्रसूतीनंतर आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक! (Women Health)
स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात, बाळाचा जन्म हा कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो. मात्र, बाळाची काळजी घेण्याच्या धावपळीत अनेकदा आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. बाळाला दूध पाजणे, त्याची देखभाल करणे, रात्रीची अपुरी झोप आणि बदललेल्या दिनक्रमाशी जुळवून घेणे, यामुळे आईवर शारीरिक आणि मानसिक ताण येतो. त्यातच प्रसूतीनंतर शरीर गर्भधारणा आणि प्रसूतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत असते. त्यामुळे या काळात आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्रसूतीनंतरचा आहार म्हणजे केवळ जास्त प्रमाणात खाणे नव्हे. शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, लोह, कॅल्शियम, चांगले स्निग्ध पदार्थ आणि पुरेसे द्रवपदार्थ मिळणे महत्त्वाचे आहे. आई बाळाला स्तनपान करत असल्यास तिच्या पोषणाच्या गरजा आणखी वाढू शकतात. त्यामुळे या काळात लगेच वजन कमी करण्यापेक्षा शरीराला सावरण्यासाठी पुरेसे आणि संतुलित पोषण मिळणे महत्त्वाचे आहे.
प्रसूतीनंतर पूरक आहाराची गरज
डॉ. प्रीथिका शेट्टी सांगतात, प्रसूतीदरम्यान झालेल्या रक्तस्रावामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर शरीरावर आलेला ताण यामुळे आईला थकवा जाणवू शकतो. योग्य आहार न मिळाल्यास शरीराची पूर्ववत होण्याची प्रक्रिया आणखी कठीण होऊ शकते. स्तनपान करत असलेल्या मातांना काही पोषक घटक आणि द्रवपदार्थांची अधिक गरज असते. मात्र, बाळाच्या संगोपनाच्या धावपळीत अनेक मातांचे जेवण वेळेवर होत नाही. अशावेळी चहा, बिस्किटे किंवा पॅकेज्ड पदार्थांवर भूक भागवली जाते. मात्र, अशा पदार्थांऐवजी पोषक आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
प्रसूतीनंतरच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा
लोहयुक्त पदार्थ : हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, डाळी, मांस, अंडी आणि लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. डॉक्टरांनी लोहाच्या गोळ्या दिल्या असल्यास त्या देखील सुरू ठेवाव्यात.
प्रथिने : डाळी, कडधान्ये, अंडी, मासे, चिकन, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पनीर, सोयाबीन आणि कडधान्यांपासून मिळणारी प्रथिने शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी उपयुक्त ठरतात.
कॅल्शियम आणि ‘ड’ जीवनसत्त्व : दूध, दही, पनीर आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. ‘ड’ जीवनसत्त्वामुळे शरीराला कॅल्शियमचे शोषण करण्यास मदत होते. त्याची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक औषधांची गरज भासू शकते.
फळे आणि भाज्या : विविध रंगांची फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करा. त्यातून आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ मिळतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासेबतच एकूण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
तृणधान्य : ओट्स, गव्हाची पोळी, ब्राऊन राईस आणि इतर संपूर्ण धान्यांमधून शरीराला ऊर्जा आणि तंतुमय पदार्थ मिळतात.
स्निग्ध पदार्थ : कडधान्ये, बिया, मासे आणि इतर आरोग्यदायी स्निग्ध पदार्थांचा संतुलित प्रमाणात आहारात समावेश करता येतो. यामधून शरीराला आवश्यक फॅटी अॅसिड्स मिळतात.
पुरेसे द्रवपदार्थ : पाणी, सूप, दूध आणि इतर पौष्टिक द्रवपदार्थांचे पुरेसे सेवन करावे. विशेषतः स्तनपान करणाऱ्या मातांनी शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्यावी.
स्वतःच्या खाण्यापिण्याकडे, आरोग्याकडे नका करू दुर्लक्ष
प्रसूतीनंतर बाळाच्या संगोपनात आई इतकी व्यस्त होते की, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यातच पूर्वीसारखी शरीरयष्टी कधी मिळणार, वजन कधी कमी होणार, असा दबावही जाणवतो. मात्र, प्रसूतीनंतरचा काळ हा लगेच वजन कमी करण्याची घाई करण्याचा नसून शरीराला सावरण्याचा आणि नव्या दिनक्रमाशी जुळवून घेण्याचा असतो. बाळाला सांभाळताना आईलाही पुरेसे आणि योग्य पोषण मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण प्रसूतीनंतर शरीराला पुन्हा ताकद मिळण्यासाठी योग्य आहार आणि पोषणाची गरज असते.
हेही वाचा :
Ganesh Chaturthi 2027: गणेशभक्तांसाठी खुशखबर..पुढच्या वर्षी गणेशोत्सव 10 दिवस लवकर! पुढच्या 11 वर्षांपर्यंत आगामी सर्व तारखा, पंचांगकर्ते सांगतात..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator