Ind vs Sl 2nd Test Shubman Gill : विजयाच्या उंबरठ्यावर टीम इंडियाचा घात! कोलंबो कसोटी हातातून गेली; शुभमन गिलने सांगितलं नेमकं कुठे चुकलं?


Ind vs Sl 2nd Test Shubman Gill : कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीचा पाचवा दिवस सुरू झाला, तेव्हा भारत सहज विजय मिळवेल वाटत होते. श्रीलंकेकडे अवघी 16 धावांची आघाडी होती आणि त्यांचे 6 फलंदाज बाद झाले होते. मात्र, सामन्याला अचानक वेगळे वळण मिळाले. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही विकेट मिळवता आली नाही. सोनल दिनुषा आणि केशरा नुवंता यांनी संयमी फलंदाजी करत श्रीलंकेचा डाव सावरला. यानंतर सामना हळूहळू भारताच्या हातातून गेला. भारतीय कर्णधार शुभमन गिलने सर्व गोलंदाजांचा वापर करून पाहिला, मात्र लंकेच्या फलंदाजांची भिंत भेदण्यात भारताला यश आले नाही. अखेर सामना अनिर्णित राहिला. सामन्यानंतर गिलने श्रीलंकेच्या खालच्या फळीतील फलंदाजांचे कौतुक केले आणि भारत अजूनही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2027 फायनलमध्ये स्थान मिळवू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.

सामना संपल्यानंतर कर्णधार गिल काय म्हणाला?

सामना संपल्यानंतर गिलला विचारण्यात आले की, भारताकडून नेमके काय वेगळे करता आले असते? त्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “खरं सांगायचं तर, काहीही नाही. तीन दिवस तुम्ही इतके षटके क्षेत्ररक्षण करता. आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले, पण त्यांनी चांगली कामगिरी केली. श्रीलंकेच्या फलंदाजांनी खूप कौशल्य दाखवले आणि त्यांना थोडी नशिबाचीही साथ मिळाली.”

भारतीय खेळाडूबद्दल काय म्हणाला गिल?

गिलने भारतीय संघाच्या सकारात्मक बाबींवरही भाष्य केले. ते म्हणाले, “मला वाटते की आमच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. प्रतिस्पर्धी संघाकडूनही शिकायला मिळाले. दबावाच्या परिस्थितीत त्यांनी ज्या पद्धतीने पुनरागमन केले, ते शानदार होते. आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी आहेत. देवदत्त पडिक्कल, मानव आणि केएल राहुलनेही चांगली कामगिरी केली. वेगवान गोलंदाजांनीही पूर्ण प्रयत्न केले. मैदानाच्या आत आणि मैदानाबाहेर आमची तयारी, कामगिरी आणि काम करण्याच्या पद्धतीत सातत्य राखणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.”

WTC फायनलमध्ये पोहोचण्याचा गिल यांना विश्वास

भारताचा पुढील प्रवासही गिलने स्पष्ट केला. तो म्हणाला, “आता आम्ही न्यूझीलंडला जाणार आहोत. ती मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. त्यानंतर एक चांगला मायदेशातील हंगाम असेल. आम्हाला आशा आहे की आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027च्या फायनलमध्ये स्थान मिळवू.”

आज कसोटी क्रिकेटचाच विजय झाला – गिल 

श्रीलंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय अखेर भारताच्या बाजूने गेला नाही. मात्र, गिलने या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, सामन्याच्या त्या क्षणी जे योग्य वाटते, तोच निर्णय घ्यावा लागतो. या गोष्टींवर केवळ नंतर चर्चा केली जाऊ शकते. त्या क्षणी तुम्ही जो सर्वोत्तम निर्णय घेऊ शकता, तोच घेता. काही गोष्टी आमच्या बाजूने गेल्या नाहीत, हा क्रिकेटचा खेळ आहे, आणि मला वाटतं शेवटी आज कसोटी क्रिकेटचाच विजय झाला, असे गिल म्हणाला.

हे ही वाचा –

Team India WTC Final Race : गौतम गंभीर परदेशात पहिल्यांदाच जिंकला, पण WTC गणित बिघडलं! टीम इंडिया आता कशी जाणार फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *