Health Tips : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यापैकी एक म्हणजे हिपॅटायटिस. हा यकृताला होणारा दाह असून तो कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. विशेषतः हिपॅटायटिस ‘ए’ आणि ‘ई’ हे प्रकार पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छ अन्न आणि शारीरीक स्वच्छतेच्या अभावामुळे होते.
यकृत शरीरातील पचनक्रिया, ऊर्जा निर्मिती आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासारखी महत्त्वाची काम करते. हिपॅटायटिसचा संसर्ग झाल्यास यकृताच्या कार्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. वेळीच उपचार न घेतल्यास काही रुग्णांमध्ये गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका असतो.
पावसाळ्यात हिपॅटायटिसचा धोका का वाढतो?
मुसळधार पावसामुळे सांडपाणी आणि कचरा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळू शकतो. असे दूषित पाणी प्यायल्यास किंवा त्याच पाण्याचा वापर करून तयार केलेले अन्न खाल्ल्यास हिपॅटायटिसचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पावसाळ्यात रस्त्यावरील अस्वच्छ अन्न, योग्य पद्धतीने साठवून न ठेवलेले खाद्यपदार्थ आणि अस्वच्छ हातांमुळेही संसर्ग होऊ शकतो.
हिपॅटायटिसची लक्षणे कोणती?
हिपॅटायटिस झाल्यास ताप, थकवा, अशक्तपणा, भूक न लागणे, मळमळ, उलट्या आणि पोटदुखी अशी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय लघवीचा रंग गडद होणे तसेच त्वचा आणि डोळे पिवळे पडणे म्हणजेच कावीळ होणे हीदेखील महत्त्वाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी सांगितलेले उपचार पूर्ण करावेत.
पावसाळ्यात हिपॅटायटिसपासून कसे संरक्षण कराल?
पिण्यासाठी नेहमी उकळून, गाळून थंड केलेले पाणी प्या. फिल्टर केलेले किंवा शुद्ध केलेले पाणी वापरावे. अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्न टाळावे. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवाव्यात. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. कच्चे किंवा अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे.
घरातील आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्यासोबतच मुलांनाही नियमित हात धुण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे. हिपॅटायटिसची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात काही साध्या सवयी अंगीकारल्यास हिपॅटायटिससह अनेक संसर्गांपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करता येते. त्यामुळे स्वच्छ पाणी, सुरक्षित अन्न आणि वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य देच यकृताच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. संदीप कडियन,जनरल फिजिशियन आणि चीफ इंटेन्सिव्हिस्ट, एम्स हॉस्पिटल, डोंबिवली
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator