Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!


ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात (Shastrinagar Hospital Dombivli) एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची पालकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गर्भधारणा तपासणी (Pregnancy Test) करण्यात आली. या पालिकेच्या रुग्णालयात तब्बल तीन वेळा केलेल्या तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचा अहवाल देण्यात आला. परंतु खासगी रुग्णालयात केलेल्या तपासणीत रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा दावा पालकांनी केला आहे.

या वादग्रस्त प्रकारामुळे शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांची कार्यपद्धती आणि वैद्यकीय तपासणीच्या अचूकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

Shastrinagar Hospital Dombivli : पालकांची परवानगी न घेता तपासणी

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती अचानक खालावल्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी मुलीच्या आई-वडिलांची अथवा पालकांची कोणतीही कायदेशीर संमती (Consent) न घेता तिची गर्भधारणा चाचणी केली. पहिल्या तपासणीनंतर डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा दोन वेळा चाचणी करण्यात आली आणि तिन्ही वेळा अहवाल पॉझिटिव्ह दाखवण्यात आला. 

Private Hospital Pregnancy Report : खासगी रुग्णालयात रिपोर्ट निगेटिव्ह

पालिकेच्या रुग्णालयातील या धक्कादायक अहवालामुळे हादरलेल्या पालकांनी मुलीला तात्काळ एका खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी केली. तिथे करण्यात आलेल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांतून परस्परविरोधी अहवाल आल्याने पालकांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

KDMC Commissioner Action : आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

या गंभीर प्रकरणाचे तीव्र पडसाद केडीएमसीच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. सदस्यांनी या विषयावर महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले.  त्यावर महापालिका आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

चौकशीत निष्काळजीपणा, नियमांचे उल्लंघन किंवा बोगस अहवाल दिल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करावी आणि त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सदस्यांनी केली आहे.

या आधीही डोंबिवलीतील महापालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय अनेक कारणांमुळे चर्चेत आलं आहे. अनेकदा या रुग्णालयात उपचार मिळत नाहीत, अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. आता तर जे काम केलं जातं त्यावरच शंका उपस्थित व्हावी अशी घटना घडली आहे. 

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *