EPFO: मोठी आनंदवार्ता, दोन दिवसात PF खात्यात जमा होणार पैसा, अपडेट काय? – Marathi News | Epfo big relief to members users now pf claims settlement process disposed in just two days what is a new development


नोकरदार वर्गासाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा पीएफची कपात होते. गरजेच्यावेळी अनेक जण पीएफ खात्यातील रक्कम काढतात. यापूर्वी ही प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ होती. गेल्या वर्षीपासून ईपीएफओमध्ये अनेक बदल झाले आहेत. कर्मचारी भविष्य निधी निर्वाह संघटनेने ऑनलाईन प्रक्रियेत मोठे बदल केले आहे. आता पीएफ खात्यातील पैसे काढणे हे म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यासारखे सोपे झाले आहे. नवीन व्यवस्थेत पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. ऑनलाईन क्लेम केल्यानंतर दोन दिवसात कर्मचाऱ्याच्या खात्यात पीएफची रक्कम जमा होणार आहे.

90 टक्के दाव्यांचा झटपट निपटारा

ईपीएफओचे वरिष्ठ अधिकारी रमेश कृष्णमूर्ती यांनी स्पष्ट केले आहे की, आता त्यांच्या विभागात कामे प्रलंबित नाहीत. नवीन पद्धतीने कामे झटपट पूर्ण होत आहे. जवळपास 90 टक्के पीएफ क्लेम आपोआप (ऑटो-सेटल) होत आहे. त्याचा फायदा नोकरदारांना होत आहे. आजारपण, लग्न, घर खरेदी, बांधण्यासाठी कर्मचार्‍यांना पैसा लागतो. निकड असताना पीएफ खात्यातील पैसा मदतीला येतो. आता पीएफ क्लेमसाठी अर्ज करताच त्याच दिवशी अथवा जास्तीत जास्त 48 तासात क्लेम सेटल होत आहे. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पीएफची रक्कम जमा होत आहे.

भीम ॲपच्या माध्यमातून UPI खात्यात जमा होईल रक्कम

पीएफ सेटलमेंटच्या प्रक्रियेला अधिक गती येणार आहे. भीम ॲपच्या मदतीने क्लेम सेटलमेंट करता येणार आहे. ईपीएफओ लवकरच BHIM ॲपच्या माध्यमातून पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. याचा अर्थ पीएफचा पैसा थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरीत होील. युपीआय लिंक असलेल्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल. अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, पुढील एका महिन्यात ही नवीन प्रणाली सक्रिय होईल. यामुळे क्लेम सेटलमेंटला गती येईल आणि कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी त्यांच्या बँक खात्यात पीएफमधील रक्कम जमा होईल.

1.44 लाख कोटी व्याज हस्तांतरीत

येत्या काळात पीएफवरील व्याजदरात वाढ होईल का? असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आहे. सध्या यावर काहीही बोलणे घाईचे ठरेल असे उत्तर अधिकाऱ्याने दिले. सध्या पीएफवर 8.25 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. ईपीएफओने 34 कोटींहून अधिक लोकांच्या खात्यात जवळपास 1.44 लाख कोटी रुपयांचे व्याज हस्तांतरीत केले आहे. व्याज जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच एटीएम आणि युपीआयद्वारे पीएफची रक्कम काढण्याची सुविधा मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *