Women Health: 20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात ‘ही’ लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका


पुणे : अलीकडच्या काळात 20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये स्तनातील गाठी (Breast Lumps) आढळण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. जरी या गाठींपैकी बहुतांश गाठी कर्करोगाच्या नसल्या तरी स्तनात जाणवणाऱ्या कोणत्याही नव्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पूर्वी स्तनातील गाठींची समस्या प्रामुख्याने वयोवृद्ध महिलांमध्ये दिसून येत होती. मात्र, आता 20, 30 आणि 40 वर्षांच्या वयोगटातील महिला देखील स्तनाशी संबंधित तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत. बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, हार्मोन्समधील असंतुलन, उशिरा होणारी गर्भधारणा, कुटुंबातील स्तनाच्या कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास तसेच महिलांमध्ये वाढलेली जागरूकता ही या वाढत्या प्रमाणामागील संभाव्य कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

स्तनात ‘ही’ लक्षणं दिसली तर वेळीच द्या लक्ष

मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे येथील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता उदय राजपूत म्हणाल्या, दर आठवड्याला 25 ते 45 वयोगटातील सुमारे 10 पैकी 3 महिला स्वयं स्तन तपासणी करताना किंवा दैनंदिन काम करताना स्तनात गाठ जाणवल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येतात. या गाठींपैकी अनेक गाठी फायब्रोअॅडेनोमा, सिस्ट, हार्मोन्समधील बदल किंवा संसर्गामुळे निर्माण झालेल्या आणि कर्करोगाशी संबंधित नसतात. मात्र, स्तनात सतत जाणवणारी गाठ, स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात बदल, स्तनाग्रातून स्त्राव होणे, त्वचेवर खड्डा पडणे, स्तनाग्र आतल्या दिशेने ओढले जाणे किंवा काखेत सूज येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे. योग्य वेळी वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक इमेजिंग चाचण्यांद्वारे गाठीचे कारण शोधता येते आणि गरज असल्यास वेळीच उपचार सुरू करता येतात.

तपासणी आवश्यक

त्या पुढे म्हणाल्या, अनेक तरुण महिलांना असे वाटते की  या तरुण वयात आपल्याला स्तनाचा कर्करोग होऊच शकत नाही आणि हा एक गैरसमज असतो. त्यामुळे त्या डॉक्टरांकडे जाण्यास विलंब करतात. स्तनात जाणवलेली कोणतीही नवीन गाठ काही आठवडे कायम राहिल्यास तिच्याकडे दुर्लक्ष करू नये. स्तनांविषयी जागरूक राहणे, नियमित स्वयं स्तन तपासणी करणे, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि ज्या महिलांना धोका अधिक आहे त्यांनी नियमित तपासणी करून घेणे, यामुळे स्तनाचा कर्करोग असल्यास तो सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतो. वेळीच उपचार केल्यास महिलांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते.

गाठीची तपासणी होणे अत्यंत आवश्यक

डॉ. राजपूत यांनी सांगितले की, स्तनांच्या आरोग्याबाबत जागरूकता हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे. दर आठवड्याला 25 ते 45 वयोगटातील सुमारे 10 पैकी 2 महिला गाठ आपोआप नाहीशी होईल किंवा ती गंभीर नसेल, या समजुतीमुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करतात. प्रत्येक महिलेने नियमित स्वयं स्तन तपासणी करावी, कोणताही असामान्य बदल जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, वजन नियंत्रणात ठेवावे, नियमित व्यायाम करावा आणि कुटुंबात स्तनाच्या कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास असल्यास डॉक्टरांना त्याची माहिती द्यावी. प्रत्येक गाठ ही कर्करोगाचीच असते असे नाही, मात्र प्रत्येक गाठीची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत निदान झाल्यास गंभीर आजार टाळतात येतो, अनावश्यक भीती कमी होते आणि आवश्यक उपचार त्वरित सुरू करता येतात.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *