छ.संभाजीनगर : राज्यात गेल्या दोन महिन्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध गुटखा आणि हॉटेल्स व्यवसायिकांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. तसेच, दूध भेसळ आणि भेसळयु्क्त पदार्थांवरूनही कारवाईचा बडगा अद्याप सुरूच आहे. त्यातच, एफडीएने आता छत्रपती संभाजी नगर शहराला इमरतीची ओळख देणारं हॉटेल एफडीएकडून सील करण्यात आलंय. येथील गंभीर त्रुटींमुळे FDA ने (FDA) थेट परवाना निलंबित करत आस्थापनाच बंद केलं.
छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध मे. उत्तम उपहार गृहवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली आहे. येथील FDA च्या धडक कारवाईत उघड झालेलं वास्तव धक्कादायक आहे. कारण, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या गोड पदार्थांच्या मागे आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं या तपासणीत समोर आलं. मिठाई तयार करण्यासाठी वारंवार वापरलेलं तेल… पुन्हा पुन्हा वापरलेलं वनस्पती तूप… झुरळांचा वावर… अस्वच्छ परिसर… ड्रेनेजजवळ उघड्यावर ठेवलेलं इडलीचं पीठ… तंबाखूची पाकिटं… भिंतींवर थुंकल्याच्या खुणा… कामगारांचे मेडिकल फिटनेस प्रमाणपत्रही नाही… इतकंच नाही तर मिठाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगाबाबत कामगारांनाही माहिती नसल्याचं एफडीएच्या तपासणीत आढळून आलं आहे.
तपासणीत आढळलेल्या प्रमुख अनियमितता :
येथील हॉटेलसाठी परवाना रेस्टॉरंट प्रकारचा होता, प्रत्यक्षात ते मिठाईचे उत्पादन करत असल्याने उत्पादकाचा परवाना आवश्यक होता.
समोसे, भजी तळण्यासाठी वापरलेलं तेल वारंवार वापरलं जात होतं. TPC तपासणीत तेलाचं BR रीडिंग 58 आढळलं, जे सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त होतं.
इमरती आणि जलेबीसाठी वापरलं जाणारं वनस्पती तूप (डालडा) पुन्हा वापरलं जात होतं. त्याचं BR रीडिंग 36 आढळलं.
अन्न तयार करण्याच्या ठिकाणी झुरळांचा वावर होता. Pest Control केल्याची नोंद उपलब्ध नव्हती.
मिठाईमध्ये Synthetic Food Color Tartrazine वापरला जात होता; मात्र त्याचा योग्य वापर किती आणि कसा करायचा, याची माहिती कामगारांना नव्हती.
भिंतींवर जळमटं आणि काळपट तेलाचा थर साचलेला होता.
25 ते 30 कामगारांचे Medical Fitness Certificate नव्हते.
इडलीसाठी आंबवलेलं पीठ ड्रेनेज लाईनजवळ उघड्यावर ठेवलेलं होतं.
समोसे-भजी तळण्याच्या ठिकाणी तंबाखू/चुन्याची पाकिटं आढळली आणि भिंतींवर थुंकल्याच्या खुणा दिसल्या.
कचरापेटी झाकलेली नव्हती, खिडक्यांना जाळ्या नव्हत्या आणि अन्न तयार करण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळली.
या सर्व गंभीर त्रुटींमुळे परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला, आस्थापना बंद करण्यात आली आणि वापरलेल्या तेल व वनस्पती तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले.
हेही वाचा
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया