शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र दिले. 6 जणांनी एकाचवेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अजूनही काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. 6 खासदारांनंतर विधान परिषदेच्या उपसभापतीपदाकरिता थेट महायुतीकडून सचिन आहिर यांनी अर्ज दाखल केला. सचिन आहिर हे शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते होते आणि आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू होते. हा ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का होता. बंडखोरी करणाऱ्या 6 खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे. ओमराजे निंबाळकर यांनीही ठाकरे गटाला राम राम करत थेट एकनाथ शिंदे यांचा हात पकडला.
ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची मैत्री अख्ख्या धाराशिव जिल्ह्याला माहिती आहे. दोघे एकमेकांचे जिगरी मित्र आहे. ओमराजे निंबाळकर ठाकरे गटातून शिंदे गटात गेले पण कैलास पाटील ठाकरेंच्या शिवसेनेतच आहेत. मुंबईला मेळाव्याला जाताना कैलास पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत दरवेळी मेळाव्याला जात असल्याचे त्यांनी म्हटले होते.
यासोबतच ज्यावेळी मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर यांना पुण्यात भेटले, त्यावेळी कैलास पाटीलही उपस्थित होते. आपल्या मित्राला मनवण्याचे काम कैलास पाटील यांच्याकडे होते. यादरम्यानच आता खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांचे एकत्र बॅनर बघायला मिळतंय. ज्यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकले आहे. आम्ही दादा प्रेमी म्हणत ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्याची बॅनरबाजी केली. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदें सोबत गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांचे धाराशिव मध्ये एकत्र बॅनर झळकले आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावण्यात आले असून धाराशिवमध्ये फक्त ओके पॅटर्न म्हणत ओमराजे निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
बॅनरवरती आम्ही दादा प्रेमी असेही लिहिण्यात आले आहे. ठाकरे शिवसेनेची साथ सोडल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. या वाढदिवसाला शिवसैनिकाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली. दुसरीकडे आमदार कैलास पाटलांनी मात्र समाज माध्यमावरून ओमराजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे टाळल आहे.