Sharad Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजकीय खेळींची चर्चा नेहमीच संपूर्ण देशात होत असते. मात्र, नुकताच बारामती दौऱ्यादरम्यान शरद पवार यांच्यातील ‘खेळाडू’ पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. बारामतीला जात असताना त्यांनी सुपे येथील ‘विद्या प्रतिष्ठान’च्या (Vidya Pratishthan) शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमोर बुद्धिबळाचा पट (chessboard) येताच, त्यांनी थेट ‘राजा’ आणि ‘वजीराला’ हात घालत रचलेली खेळी सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल होत आहे.
Sharad Pawar: विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद
बारामती दौऱ्यावर जात असताना शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांनी सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला. विद्यार्थ्यांनी शाळेत राबविलेल्या विविध नवनवीन उपक्रमांची माहिती शरद पवारांनी घेतली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि बुद्धिमत्तेला वाव मिळण्यासाठी शाळा करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
Sharad Pawar: बुद्धिबळाच्या पटावरील ‘ती’ खेळी चर्चेत
या भेटीदरम्यान शरद पवार यांच्या समोर एका विद्यार्थिनीने बुद्धिबळाचा पट आणला. राजकारणातील मातब्बर खेळाडू असलेल्या शरद पवारांसमोर बुद्धिबळ आल्यावर ते स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी पटाकडे पाहत अत्यंत कौशल्याने थेट ‘राजा’ आणि ‘वजीरावर’ आपली बोटे ठेवली आणि एक चाल खेळली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
Sharad Pawar: काय म्हणाले शरद पवार?
या भेटीनंतर शरद पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून भावना व्यक्त करताना सांगितले की, बारामतीला जात असताना सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्यांचा आणि सर्जनशीलतेचा विकास व्हावा यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच विविधांगी उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग आणि नेतृत्व उल्लेखनीय आहे.
बदलत्या जगातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली विचारक्षमता, सृजनशीलता आणि आत्मविश्वास यांची जडणघडण विद्या प्रतिष्ठानमध्ये होताना दिसते. विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंद यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला