Satej Patil on Jayant Patil: जयंतराव ‘उजव्या वळणावर’ येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?


Satej Patil on Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एनडीए (NDA) मध्ये सामील होऊन ‘उजव्या वळणावर’ जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी अत्यंत सूचक आणि महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांच्या भूमिकेपासून ते राज्यातील कर्जमाफी आणि शक्तीपीठ महामार्गाच्या वादावर सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली.

जयंत पाटील महायुतीसोबत जाणार?  

जयंत पाटील यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेवर सतेज पाटील म्हणाले, “जयंत पाटील हे एनडीए सोबत जाऊ नये अशी आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. जयंत पाटील हे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन पुढे चालणारे खंबीर नेतृत्व आहे. इतकेच नव्हे तर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा घेऊन पुढे जाणारे ते नेते आहेत. त्यामुळे पाटील साहेब महायुतीसोबत जाण्याचा असा कोणताही निर्णय घेतील, असे मला वाटत नाही.” ते पुढे म्हणाले की, “आम्हा सगळ्यांना माहिती आहे की आत्ताचा काळ कठीण आहे, पण हा कठीण काळ देखील निघून जाणार आहे. 2029 ला राज्याच्या राजकारणात नक्की बदल होईल याची आम्हा सगळ्यांना पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण ताकतीने एकत्र राहू आणि जयंत पाटील साहेब देखील शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार घेऊनच आमच्या सोबत राहतील, याची मला खात्री आहे,” असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारच्या ‘मिसिंग लिंक’वर आक्षेप

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना सतेज पाटील यांनी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली. ते म्हणाले, “एककीडे सरकार सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगते, आणि दुसरीकडे मात्र त्यासाठी अनेक जाचक अटी लावल्या जातात. अटी लावायच्या असतील तर त्याला ‘सरसकट’ कसे म्हणता येईल? या सरकारच्या केवळ घोषणा आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यात खूप मोठी ‘मिसिंग लिंक’ आहे.” शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांना हात घालताना त्यांनी वीज बिल सवलतीवरही बोट ठेवले. शेतकऱ्याच्या नावाखाली तिकडे MSEB कडे (वीज कंपन्यांकडे) भ्रष्टाचाराचे पैसे जाऊ नयेत, असे आम्हाला वाटते. याशिवाय एमपीएससी (MPSC) परीक्षा ऑनलाईन करावी अशी मागणी आम्ही लावून धरली होती, परंतु हे सरकार सर्वच प्रश्नांचा विचका करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

‘शक्तीपीठ’ गरज नसलेला महामार्ग

शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सांगितले की, “शक्तीपीठ हा पूर्णपणे गरज नसलेला महामार्ग आहे. गेले अडीच वर्षे या महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. मात्र, या शक्तीपीठबद्दल विधिमंडळात साधी चर्चा देखील होऊ नये, अशी या सरकारची हुकूमशाही भूमिका आहे,” असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आषाढी वारीच्या दौऱ्याचा संदर्भ देत त्यांनी सरकारला टोला लगावला. “मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विठ्ठलाला साकडं घालतात, पण मग या महामार्गातून शेतकऱ्यांचे नेमके भलं कसं होणार, हे आधी मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगावे. आम्ही देखील विठ्ठलाला साकडे घालतो आहे की हा महामार्ग कायमचा रद्द व्हावा आणि विठ्ठल माऊलीने मुख्यमंत्री यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी द्यावी. आता हे सरकार विठ्ठलाचे तरी ऐकते का, हेच पाहावे लागेल,” असा टोला सतेज पाटील यांनी लगावला.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *