सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपं एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. या संदर्भात घडामोडी सुरु असल्याच्या सातत्याने बातम्या येत आहेत. मुंबईत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे विनोद तावडे यांच्यात बैठक झाल्याचं वृत्त आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात दोन्ही पक्ष कधीपर्यंत एकत्र येतील हे कोणीही ठामपणे आज सांगू शकत नाहीत. पण महाराष्ट्राच्या एका तालुक्यात मात्र या दोन पक्षांमध्ये मनोमिलन झालं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आले.
नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्यावरील अविश्वास ठरावापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. रोहिणी घुले यांना बाजूला ठेवण्यासाठी राम शिंदे आणि रोहित पवार एकत्र आले. कर्जत नगर पंचयातीवर राम शिंदे यांचं वर्चस्व कायम झालं आहे. कर्जतच्या राजकारणार राम शिंदे आणि रोहित पवार हे परस्परांचे विरोधक मानले जातात. रोहित पवार यांनी दोनवेळा विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा पराभव केला आहे. पण आता बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.
भाजपला शरद पवारांचा फायदा केंद्राच्या राजकारणात
अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्तेत सहभागी होणार होत्या अशा चर्चा सुरु झालेल्या. त्यानंतर आता पुन्हा शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा एनडीए सोबत जाणार अशा चर्चा आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आणि 8 खासदार आहेत. भाजपला शरद पवारांचा फायदा केंद्राच्या राजकारणात आहे. तिथे भाजपचं संख्याबळ अजून वाढेल. शरद पवारांनी भाजपंसोबत जाण्याआधी पक्षातील सर्व आमदार, खासदारांसोबत बोलण्याची जबाबदारी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर सोपवल्याची चर्चा आहे. त्या शिवाय भाजपसोबत वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याची जबाबदारी सुद्धा एका नेत्यावर दिल्याची माहिती आहे.