Jofra Archer-Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 4th T20 : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अपयशी ठरला. भारताचा 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने डावाची चांगली सुरुवात केली होती. त्याने दोन शानदार षटकारही मारले, परंतु तो आपली खेळी मोठी करू शकला नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने त्याला बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता आर्चरने वैभव सूर्यवंशीबाबत एक मोठे वक्तव्य केले असून आगामी सामन्यांसाठी त्याला थेट इशारा दिला आहे.
वैभव आणि जोफ्रा यांच्यातील चुरस
या टी-20 मालिकेत जोफ्रा आर्चर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभवने जोफ्राच्या चेंडूवर एक खणखणीत षटकार ठोकला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातही त्याने आर्चरचा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला. मात्र, आर्चरनेही तितकेच चोख प्रत्युत्तर दिले. त्याने एका भेदक बाउन्सरवर वैभवला बाद केले आणि त्याची 13 धावांची खेळी संपुष्टात आणली.
वैभवला बाद केल्यावर जोफ्रा काय म्हणाला?
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जोफ्रा आर्चरला वैभव सूर्यवंशीला बाद करण्याबाबत विचारण्यात आले. त्यावर आर्चरने स्पष्ट केले की, वैभवची विकेट घेऊन त्याने आधी मारलेल्या दोन षटकारांचा हिशोब चुकता केला आहे. तो म्हणाला की, “मला वाटतं आता आमचा हिशोब बरोबर झाला आहे.”
भारत आणि इंग्लंड यांच्यात अजून दोन टी-20 सामने शिल्लक आहेत. जोफ्रा आर्चरने वैभव सूर्यवंशीला एक प्रकारे आव्हानच दिले आहे. आगामी सामन्यांमध्ये जो सरस कामगिरी करेल, तोच बाजी मारेल असे त्याने स्पष्ट केले. आर्चर म्हणाला की, “मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत आणि परिस्थिती कोणत्याही बाजूने बदलू शकते. जो संघ किंवा खेळाडू मैदानात अधिक चांगला खेळ करेल, तोच जिंकेल.”
इंग्लंडच्या विजयावर आर्चरची प्रतिक्रिया
इंग्लंडच्या या शानदार विजयावर बोलताना जोफ्रा आर्चरने संघाच्या रणनीतीचे कौतुक केले. तो म्हणाला, “कधीकधी तुम्हाला मैदानावरील आपल्या भावभावनांवर आणि उत्साहावर नियंत्रण ठेवावे लागते. आज आम्ही तेच केले आणि त्याचा सकारात्मक निकाल आमच्या बाजूने लागला.”
भारत-इंग्लंड दरम्यान पुढील सामना कधी?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुढील चौथा टी-20 सामना गुरुवार 9 जुलै 2026 रोजी ब्रिस्टल येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता सुरू होईल. सध्या इंग्लंडने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा असून, टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवून आपले खाते उघडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
हे ही वाचा –