Ind vs Eng 3rd T20I LIVE : इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?


India vs England 3rd T20I LIVE : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज, म्हणजेच मंगळवार (7 जुलै) रोजी नॉटिंगहॅम येथील ऐतिहासिक ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवला जात आहे. भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मालिका जिवंत ठेवण्यासाठी आणि आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी भारताला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता. तर, इंग्लंडने दुसरा सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला आयर्लंड दौऱ्यावर 0-2 असा क्लीन स्वीप स्वीकारावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ सध्या सलग पराभवाच्या छायेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला. रवी बिश्नोईच्या जागी प्रिन्स यादवला संधी देण्यात आली.

श्रेयस अय्यरला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा

भारताचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि संघाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी श्रेयसवर या सामन्यात मोठा दबाव असेल. या मालिकेत भारताचा युवा आणि प्रतिभावान खेळाडू वैभव सूर्यवंशी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि इतर अनुभवी फलंदाजांकडून भारतीय चाहत्यांना एका मोठ्या आणि दमदार खेळीची अपेक्षा असेल, जेणेकरून इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण करता येईल.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन (Playing XI) : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टिरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

भारताची प्लेइंग इलेव्हन (Playing XI) : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

भारत-इंग्लंड हेड-टू-हेड रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 क्रिकेटमधील लढत नेहमीच रोमांचक ठरली आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 32 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 18 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून, इंग्लंडने 13 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना निकालाशिवाय संपला आहे. त्यामुळे एकूणच टी-20 क्रिकेटमध्ये भारताचे पारडे किंचित जड असल्याचे दिसून येते. मात्र, इंग्लंडच्या भूमीवर चित्र थोडे वेगळे आहे. इंग्लंडमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 11 टी-20 सामने झाले आहेत. त्यापैकी यजमान इंग्लंडने 6 सामने जिंकले, तर भारताला केवळ 4 विजय मिळवता आले आहेत. एक सामना पावसामुळे निकालाशिवाय राहिला. त्यामुळे घरच्या मैदानावरील इंग्लंडचा दबदबा स्पष्टपणे दिसून येतो.

ट्रेंट ब्रिजवर दुसऱ्यांदा आमनेसामने

नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा दुसराच टी-20 सामना असणार आहे. यापूर्वी 2022 मध्ये या मैदानावर दोन्ही संघांची गाठ पडली होती. त्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 215 धावांचा मोठा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्या सामन्यात सूर्यकुमार यादवने अवघ्या 55 चेंडूंमध्ये 117 धावांची तुफानी शतकी खेळी करत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली होती. त्याच्या दमदार खेळीमुळे भारत विजयाच्या जवळ पोहोचला, पण अखेरीस संघाला सामना जिंकता आला नाही.

हे ही वाचा –

Hardik Pandya Trade IPL 2027 : ना सीएसके, ना केकेआर… हार्दिक पांड्या जाणार RCB मध्ये? मुंबई इंडियन्स 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात करणार मोठा ट्रेड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *